मुंबई : प्रखर उन्हाचे चटके सहन करीत असलेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने रविवारी सुखद बातमी दिली. अंदमानात दाखल झाल्यानंतर झपाट्याने प्रगती करीत असलेला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
यापूर्वी हवामान खात्याने केरळात २७ मेपर्यंत मान्सून दाखल झालेला असेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, सध्या मान्सून ज्या गतीने प्रगती करीत आहे, ती पाहता तो २४ केरळात दाखल झाला. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये तो राज्यात दाखल झाला आहे.
अपेक्षित कालावधीत मान्सून केरळात दाखल झाल्याने २००९ नंतर प्रथमच मान्सून निर्धारित वेळेच्या आधी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २००९ मध्ये मान्सूनचे केरळात २३ मे रोजी आगमन झाले होते.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांसाठी हवामान अनुकूल असल्याने नैऋत्य मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, असे मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी भुते यांनी सांगितले होते.

त्या म्हणाल्पा, अनुकूल हवामान परिस्थितीमुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे आणि तो महाराष्ट्राकडे हळूहळू सरकत आहे. हा अंदाज सध्याच्या निरीक्षणांवर आधारित आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण प्रदेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीवर, असे त्यांनी सांगितले होते.