Monsoon Update : अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय कृषी क्षेत्रासाठी यावर्षीचा मान्सून कसा राहणार, याबाबत भारतीय हवामान खात्याने मंगळवारी आपला पहिला अंदाज जाहीर केला. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून, मान्सूनच्या पावसाची सरासरी १०५ टक्के इतकी राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. भूविज्ञान मंत्रालयातील सचिव एम. रविचंद्रन् यांच्यासोबत आज येथे आयोजित पत्रपरिषदेत हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मान्सूनच्या अंदाजाबाबतची माहिती दिली.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सूनच्या काळात देशात ९६ ते १०५ टक्के अर्थात् ८७ सेंटीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ही टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त पावसाचे संकेत दर्शविते, असे मोहपात्रा यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मागील वर्षी देशात वर्तविलेल्या अंदाजापेक्षा आठ टक्के जास्त पाऊस झाला होता.
कृषिक्षेत्राला दिलासा
भारताची अर्थव्यव्यस्था कृषीवर आधारित असल्याने आणि सध्या काही भागांमध्ये अवकाळीचा फटका बसला असल्याने पुढील हंगामी पिकांसाठी हवामान खात्याचा हा अंदाज दिलासादायक असाच आहे: कारण आशियातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतीय कृषीतील उत्पन्न वाढीसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. देशातील ४२ टक्के जनता कृषिक्षेत्राशी संलग्न आहे.
अल् निनोचा प्रभाव नाही
यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अल् निनो फारसा सक्रिय राहणार नसल्याचे त्याचा मान्सूनवर कुठलाही परिणाम होणार नाही, अशी माहिती मोहपात्रा यांनी दिली.
महागाई नियंत्रणात येणार
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्याच्या परिणामाने महागाई नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास मोहपात्रा यांनी व्यक्त केला.
पुढील अंदाज मेच्या शेवटच्या आठवड्यात
हवामान खाते मान्सूनची प्रगती आणि केरळातील त्याच्या आगमनाबाबतचा पुढील अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार आहे, असे मोहपात्रा यांनी सांगितले.
अशी काढली जाते पावसाची टक्केवारी
९० टक्क्यांपेक्षा कमी – अपुरा पाऊस
९० ते ९५ टक्के – सरासरीपेक्षा कमी पाऊस
९६ ते १०४ टक्के – सरासरीइतका पाऊस
१०५ ते ११० टक्के – सरासरीपेक्षा जास्त पाऊस
११० टक्क्यांपेक्षा जास्त – सर्वाधिक पाऊस