पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्थानिक गुंड दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीती पसरवत आहेत. अशाच प्रकारची घटना बिबवेवाडी परिसरात घडली असून, तब्बल ४० हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आरोपींची धिंड काढत चोख प्रत्युत्तर
बिबवेवाडी भागात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अटक केली. अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी त्यांची परिसरातून धिंड काढली. आरोपींना गुडघे टेकवत त्यांची धिंड काढल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खून, दरोडे, चोरी, अत्याचार आणि वाहनफोडी सारख्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिला कडक इशारा
बिबवेवाडी परिसरात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी अशा गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारे सोडणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आता गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या घटनेनंतर पुणे पोलिसांची त्वरित कारवाई आणि कठोर पद्धतीने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.