सर्वोच्च न्यायालयातून इतके हजारांहून अधिक खटले निकाली; सहा वर्षातील सर्वोच्च आकडेवारी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २०२३ या वर्षात ५२ हजारांहून अधिक खटल्यांचा निपटारा केला आहे. हा आकडा गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च आकडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत माहिती जारी करून २०२३ या वर्षात निकाली काढलेल्या प्रकरणांची माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरात ५२ हजार १९१ प्रकरणे निकाली काढली आहेत. गतवर्षी ही संख्या ३९ हजार ८०० एवढी होती. वर्षभरात एकूण ४५ हजार ६४२ विविध प्रकरणे आणि सुमारे ६ हजार ५४९ नियमित प्रकरणांचा निकाल लागला आहे. त्याचप्रमाणे १ जानेवारी २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत ४ हजार ४१० सेवा प्रकरणे, ११ हजार ४८९ फौजदारी प्रकरणे आणि १० हजार ३४८ दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
इंटिग्रेटेड केस मॅनेजमेंट सिस्टीमच्या डेटानुसार खटले निकाली काढण्याचा हा दर गेल्या सहा वर्षातील सर्वोच्च दर आहे. विशेष म्हणजे वर्षभरात ५२ हजार ६६० प्रकरणे दाखल होऊनही तेवढ्याच संख्येने म्हणजे ५२ हजार १९१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणांची पडताळणी आणि यादी करण्यासाठीचा कालावधी सुव्यवस्थित करण्यात आला असून तो १० दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वेनवान निकालासाठी कार्यक्षम प्रक्रिया
जामीन, हॅबियस कॉर्पस, बेदखल प्रकरणे, विध्वंस आणि आगाऊ जामीन यासारख्या काही प्रकरणांमध्ये एका दिवसात प्रक्रिया करण्यात येऊन प्रकरणे न्यायालयामध्ये सूचिबद्ध करण्यात आली. अशी विशेष श्रेणीतील प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी विशेष खंडपीठांचीही स्थापना करण्यात आली होती.