जपानहुन आयात होणार रसायन करणार १५ मिनटात डासांचा मृत्यू!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने डेंग्यू आणि मलेरिया आजार पसरवणाऱ्या डासांना रोखण्यासाठी जपानी रसायनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रसायन जपानमधून आयात केले जाणार असून २०१७ पूर्वीही पालिकेने या रसायनाचा वापर डासांना रोखण्यासाठी केला होता. मात्र त्यावेळी जपानी कंपनीने आयाती संदर्भात केलेल्या धोरणामुळे याचा वापर बंद झाला होता. मात्र आता अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे याचा वापर पुन्हा सुरु होणार आहे. या रसायनामुळे १५ मिनटात डासांचा मृत्यू होतो.

पावसाळा सुरु होताच डेंग्यू आणि मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागतो. जूनमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या सहा महिन्यात मलेरिया या आजाराचे जवळपास दोन हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सायफेनोथ्रिन नावाचे जपानी रसायन सुमितोमो केमिकल कंपनीकडून आयात केले आहे. दरम्यान मागील आठवड्यात जपानी कंपनीने चार हजार लीटर रसायन पालिकेला सीएसआर निधीतून दिले होते. ज्यांमुळे डासांचा प्रभावी नायनाट झाला. त्यामुळे आचारसंहितेनंतर लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. त्यात पालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून डास प्रतिबंधासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक सेलिब्रिटींनी डासांचा नायनाट करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे. तसेच पालिकेने डासांचा नायनाट कसा करावा, यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी ‘ Mumbai Against Dengue’ हे मोबाईल ऍप डाउनलोड करण्यास सांगितले आहे.