जळगाव : तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने त्यांना रोजगार मिळत नाही. याअनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ३६८ तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल. या युवकांना जिल्हा परिषदेच्या विविध आस्थपानांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र बेरोजगार तरुणांनी अर्ज करुन या प्रशिक्षणाचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित व उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी १८ ते ३५ वर्ष वय असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी सोबत विद्यावेतन देण्यात येणार आहे. यात उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार,आयटी आय व पदविका उत्तीर्ण उमेदवारांना ८हजार, पदवीधर व पदवीत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये इतके विद्यावेतन दरमहा देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका असेल. यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्यालय, पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अशा विविध आस्थापनांसाठी १ हजार ३६८ युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ५६१ उमेदवारांना या अंतर्गत प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.