---Advertisement---
Muktainagar Crime: मुक्ताईनगर -शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करत स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिनांक 27 सप्टेंबरच्या रात्री ते 28 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत एकाच भागातील तीन घरे चोरट्यांनी फोडली आहे. या तिन्ही घरफोडून चोरट्यांनी एकूण 41 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. शुभम पुरुषोत्तम कलंत्री (वय 29), यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या आई राजकौर कलंत्री आणि काका संतोषकुमार माणिकलाल कलंत्री (सरकारी यकील, मुक्ताईनगर कोर्ट) यांच्यासह गोदावरी नगर भागात राहत आहेत. 27 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता घरातील सर्व सदस्य झोपले होते. शुभम हे खालच्या मजल्यावर तर आई व काका हॉलमध्ये झोपले होते. पहाटे सुमारास शुभम यांच्या आईने त्यांना उठवले व घरात चोरी झाल्याचे सांगितले. घराबाहेरून कोणतीही तोडफोड न करता चोरट्यांनी घराच्या किचनमार्गे प्रवेश करून वरच्या मजल्यावरील संतोष कलंत्री यांच्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमधून 500 रुपयांच्या 54 नोटा (एकूण 27,000 रुपये) आणि काळ्या रंगाच्या पाकिटातील 5,000 रुपये असा रोख ऐवज लंपास केला होता.
दरम्यान, याच परिसरातील मनोज अशोक कुलकर्णी यांच्या घरातसुद्धा चोरट्यांनी खिडकीची ग्रील कापून प्रवेश केला. घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटातील लॉकरमधून 2,500 रुपये रोख आणि लेडीज पर्समधून 7,000 रुपये चोरले गेले.
तिसरी घटना शुभम यांच्या घरासमोर काही अंतरावर राहणाऱ्या सुजीत पंढरीनाथ पाटील यांच्या घरी घडली. येथेही खिडकीची ग्रील कापून अज्ञात चोरट्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र काही नुकसान झाल्यानंतर ते निघून गेले.
या तिन्ही घरफोडीच्या घटना एकाच रात्रीत, 27 सप्टेंबरच्या रात्री 10.30 ते 28 सप्टेंबरच्या सकाळी4.45 वाजेच्या दरम्यान घडल्या असून, चोरट्यांनी एकूण 41,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
---Advertisement---