वॉशिंग्टन डीसी : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रर्त्यापणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मूळचा पाकिस्तानचा राहणारा राणा कॅनडाचं नागरिकत्व बाळगून होता. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी जोडला गेलेला दहशतवाद्यांच्या या म्होरक्याला अमेरीकेने २००९ साली अटक केली होती. दहशतवादी कारवाईंसाठी त्याची रवानगी भारतात होऊ नये यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. अखेर अमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका रद्द केली आहे.
१३ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेरीकेतल्या सर्वोच्च न्यायालयात आपल्या प्रत्यार्पणाच्या विरोधात बचावासाठी याचिका दाखल केली होती. अमेरीकेतील अनेक फेडरल कोर्ट्समध्ये राणा याने याचिका दाखल केली होती. परंतु प्रत्येका ठिकाणी त्याला अपयशाचाच सामना करावा लागला. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरीकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्ताब केला.
तहव्वुर राणा याने पाकिस्तानी सैन्याचा अधिकारी आणि कुख्यात दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याला २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी मदत केली होती. तहव्वुर राणाच्या मदतीने डेव्हिड हेडलीने हल्ला करण्याच्या ठिकाणांवर रेकी केली होती. डेव्हिड हेडलीला अमेरीकेमध्ये अटक करण्यात आली. आपला कबुलीजबाब नोंदवताना त्याने यामध्ये तहव्वुर राणाचा हात असल्याचे सुद्धा सांगितले. यानंतर राणाला १४ वर्षांचा कारवास अमेरीकेच्या न्यायालयाने ठोठावला.
मागच्या दशकभरापासून भारत सरकार तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. २६/११ च्या हल्ल्यामध्ये लष्कर ए तैयबाचे १० दहशतवादी भारतात शिरले. त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये ६ अमेरीकेच्या नागरिकांचा सुद्धा समावेश होता. २०२० साली आरोग्यविषयक समस्यांमुळे राणा याची अमेरीकेच्या तुरूंगातून मुक्तता करण्यात आली. भारतीय अधिकाऱ्यांनी यानंतर कारवाईचा वेग आणखी तीव्र केला. २०२१ साली जो बायडेन यांच्या प्रशसनाने भारताची मागणी मान्य केली.