तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३। प्रा. डॉ. अरुणा धाडे
कुठल्याही कामाची सुरुवात गणेश पूजनाने करण्याची आपली परंपरा आहे. म्हणून ‘मंदिराविषयीच्या’ सदराची सुरुवात गणेश मंदिराने करतेय. आपल्या देशात अनेक गणेश मंदिर आहेत. अनेक भक्तांचे श्रीगणेश आराध्य आहेत, तसे माझेही गणपती बाप्पा दैवत आहेत.
जेव्हा कधी भारतात येणं होतं तेव्हा सर्वप्रथम सिद्धी विनायकाचं दर्शन घेणं आणि नंतर पुढच्या प्रवासाला लागणं हा शिरस्ता मागच्या कित्येक वर्षांपासूनच्या भारतभेटी दरम्यान कायम राहिलेला आहे. बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. प्रत्यक्ष दर्शन होतं तेव्हा ते सुंदर रूप बघून डोळे पाणावतात. मन भरून येतं.
दादर येथील प्रभादेवी भागात असलेले भव्य सिद्धिविनायक मंदिर भारतातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. ह्या देवस्थानाचे कार्तिक शुद्ध चतुर्दशी शालिवाहन शके 1723 मध्ये पहिले जीर्णोद्धार करण्यात आले.
मंदिरातील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या पाषाणात आहे. चतुर्भुज आहे. एका हातात कमळ दुसर्या हातात लहान परषु, उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. चरणाजवळ मूषकराज आहे. श्री सिद्धिविनायक कमळावर पद्मासन मुद्रेत आसनस्थ आहेत. रक्तगंधालीप्त असलेल्या मूर्तीच्या डावी आणि उजवीकडे ऐश्र्वर्य आणि सुख-समृद्धी देणार्या रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत. म्हणून या गणपतीला ‘महागणपती’सुद्धा म्हणतात. सुंदर सोनेरी किरीटाने मूर्ती सुशोभित आहे. दुर्मिळ मानले गेलेले गणेशाचे त्रिनेत्रधारी रूप फार मनोहारी आहे.
मंदिराच्या सिद्धीविनायक नावासंदर्भात असा उल्लेख आहे की, मंदिरातील गणेश मूर्ती उजव्या सोंडेची असल्याने ती सिद्धीपीठाशी जोडलेली आहे म्हणून मंदिराचे नाव सिद्धीविनायक आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती स्वयंभू मानली जाते, जी संजीवन आहे.
मंदिर प्रांगणात गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाच्या चांदीच्या दोन मुर्ती आहेत. आपल्या मनातल्या इच्छा उंदराच्या कानात हळूच सांगायच्या, ज्या उंदीरमामा गणपती बाप्पाला सांगतो आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात, अशी भक्तांची आपल्या बाप्पाच्या बाबतीत श्रद्धा आहे.
बाहेरुन बघताना लक्षात येत नाही पण मंदिराची वास्तू चांगली पाच मजली आहे. मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या सुंदर प्रतिमा कोरलेल्या आहेत. छतावर आकर्षक नक्षीकामावर सोन्याचा मुलामा आहे. परिसरात हनुमानाचे मंदिरही आहे.
मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जून येतात. संकष्ट चतुर्थीला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंगारकी चतुर्थीला तर भाविकांची भली मोठी रांग लागते.
श्री सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात एक अनोखी कहाणी सांगितली जाते. मुंबईतील प्रभादेवीचे श्री रामकृष्ण जांभेकर महाराज श्रीस्वामी समर्थांचे भक्त होते. एकदा स्वामी समर्थांनी त्यांना सांगितले की, तू सिद्धिविनायकाला मंदाराचे रोपटे लाव. मंदार इंचा इंचाने वाढेल, तसा श्री सिद्धिविनायकाचा महीमा वाढेल. जांभेकर महाराजांनी स्वामीसमर्थांच्या सांगण्यानुसार मंगळवारी मंदाराचे रोपटे मंदिरात लावले. मंदार वाढत गेला तसा सिद्धीविनायकाची प्रचिती भक्तांमधे वाढत गेली.
आपल्या भक्तांना संपन्न करणारा, इच्छापूर्ती करणारा श्री सिद्धिविनायक बघताबघता एका छोट्या मंदिरापासून भारतातील सर्वात श्रीमंत धनसंपन्न वैभवशाली मंदिर झालं.