मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या बदलीला मॅटकडून तात्पुरती स्थगिती

महापालिका आयुक्त डॉ.विदया गायकवाड यांच्या बदलीस मॅटने (महाराष्ट्र अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनल) ने तात्पुरतील स्थगिती दिली. 9 डिसेंबर रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. 2 रोजी सकाळी 11 वा. पुन्हा पदभार घेणार आहेत. नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार हे एक दिवसाच्या रजेवर गेले आहेत.

महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती, त्यांना कोणतीही पदस्थापना देण्यात आली नव्हती, मात्र त्यांच्या जळगाव येथील आयुक्तपदी परभणीचे आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीही आदेश मिळताच बुधवारी पदभारही स्विकारला.या कालावधीत आयुक्त डॉ.विदया गायकवाड या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या.पदभार देतांना त्या हजर नव्हत्या.त्यामुळे एकतर्फी पदभार घेतल्याचा त्यांचा दावा आहे.

याबदलीच्या विरोधात महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी मॅट(महाराष्ट्र अ‍ॅॅडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनल)मध्ये याचिका दाखल केली होती .त्यांच्या वतीने अविनाश एस. देशमुख यांनी बाजू मांडली महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेवून आपल्याला केवळ सात महिने झाले आहेत. कोणतेही कारण नसतांना आपली बदली करण्यात आली. तसेच आपल्याला कोणतीही नियुक्ती न देता परस्पर पदमुक्त करण्यात आले. शासननियमाप्रमाणे ही प्रक्रीया झालेली नाही. याबाबत आपल्यालाही विचारात घेणे गरजेचे होते, त्यामुळे या बदलीला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनीं केली आहे. याचिकेवर सुनावणी होऊन ‘मॅट’चे व्हाईस चेअरमन पी.आर.बोरसे यांनी या बदलीच्या 29 नोव्हेंबर 2022 च्या शासनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. याप्रकरणी 9 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

डॉ.गायकवाड आज पदभार घेणार

‘मॅट’बदलीच्या आदेशास दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीबाबतचे आदेश सायंकाळी उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ.विद्या गायकवाड उद्या 2 रोजी सकाळी 11 वा. पुन्हा आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले.

आयुक्त पवार रजेवर

महापालिकेत आयुक्तपदाचा पदभार घेतलेले देवीदास पवार हे एक दिवसाच्या रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता आपला एक दिवसाचा रजेचा अर्ज त्यांनी दिला आहे. नांदेड येथे त्यांच्या भावाच्या वर्षश्राध्दासाठी ते गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही, त्यामुळे आता त्यांच्या नवीन नियुक्तीचे काय? हा प्रश्नही आहेच.