महापालिका संकुल गाळेभाडे निर्धारण समिती बैठकीत अध्यादेशाचे वाचन

जळगाव : महापालिका व्यापारी संकुलाच्या गाळेभाडे निर्धारण समितीची बैठक मंगळवार, 12 डिसेंबरला आयुक्तांच्या दालनात झाली. पहिल्या बैठकीत सरकारच्या अध्यादेशाचे वाचन करून त्यावर चर्चा करण्यात आली आहे.

व्यापारी संकुलाच्या गाळेकराबाबत सरकारच्या अध्यादेशातील तरतुदींचे वाचन झाल्यावर बैठक झाली. बैठकीची पुढील तारीख लवकर जाहीर करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 25 व्यापारी संकुलांपैकी 21 संकुलातील गाळेधारकांची कराराची मुदत संपलेली आहे. त्या संकुलातील गाळेधारकांचा नवीन करार करण्याबाबत सरकारने महापालिकेला आदेश दिले असून त्यासाठी समिती नियुक्ती करून निर्णय घेण्याचे कळविले आहे. सरकारच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे

यांची होती उपस्थिती

अतिरिक्त आयुक्त अविनाश गांगोडे, महसूल उपायुक्त निर्मला गायकवाड पेखळे, नगररचना सहाय्यक संचालक श्री. तायडे, महापालिका मुख्य विधी सल्लागार आनंद मुजुमदार, मुद्रांक दुय्यम निबंधक, नगरचना सहाय्यक हे समिती सदस्य उपस्थित होते.

विधी सल्लागारांची नियुक्ती

सरकारने समिती नियुक्त करण्याच्या सूचना दिली आहे. त्यात एक ज्येष्ठ तज्ज्ञ घेण्याचा आदेशही आहेत. महापालिका आयुक्तांना त्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी महापालिकेचे विधी सल्लागार ॲड. आनंद मुजुमदार यांची नियुक्ती केली आहे. परंतु गाळेधारक संघटनेने समितीवर आक्षेप घेतला आहे. समितीत गाळेधारक संघटनेचा एक प्रतिनिधी घेण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

गाळेधारकांचा प्रतिनिधी समितीत घेण्याचा प्रश्न कायम आहे समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी नसेल, तर आमच्यावर अन्याय होईल, असेही म्हणणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. परंतु याबाबत समितीच्या अध्यक्षा डॉ. गायकवाड यांनी कोणतीही माहिती दिली नाही.