जळगाव : शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या मालकीचे 250 रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला पुर्नबांधणी करण्यासाठी हस्तांतरीत केले आहे. त्याबाबतच्या सर्व प्रकारच्या एनओसी व रस्त्यांची यादीसह निधीही हस्तांतरीत केला आहे. त्यानुसार त्यांनी रस्त्याच्या कामास सुरुवात करणे गरजेचे आहे. याबाबत महापालिकेने बांधकाम विभागाला स्मरणपत्रे दिलीत. मात्र त्यांच्याकडून शून्य प्रतिसाद मिळत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले असता ते फोनही घेत नाहीत आणि मनपाच्या बैठकांनाही येत नाहीत. त्यामुळे आता काय त्यांना खरमरीत पत्र लिहावे का? बरं पत्र लिहूनही उपयोग हाईल का? त्यामुळे आता मी काय करू? असा उद्वेग महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आणि अमृत व ड्रेनेज पाईपलाईनमुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी आमदारांसह तत्कालीन नगरसेवकांनी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तरीही रस्त्यांची कामे होत नसल्याने नागरिकांमधून महापालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहेत.
आमदारांना चालायला लावले निसरड्या रस्त्यावर
रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत नागरिकांचा संताप तीव्र होत आहे. अशातच शहराचे आमदार सुरेश भोळे यांना नागरिकांनी बोलावून घेत त्यांच्या घराजवळील चिखलयुक्त निसरड्या रस्त्यावरून चालण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आमदारांसह तत्कालीन नगरसेवकांचा महापालिका प्रशासनावर दबाव वाढत आहे.
आता मी काय करू..
प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘आता मी काय करू’ या नावाने व्हिडीओ श्रृंखला सुरू केली आहे. या श्रृंखलेचे काही भाग मनपाच्या वेबसाईटसह फेसबूक, इन्स्टाग्रामवरून प्रसारीत झाले आहेत. यावरून त्यांना शहरातील संतप्त नागरिकांसह माजी महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांनी चांगले ट्रोल केले आहे.
पुढचे लक्ष्य बांधकाम विभाग
रस्त्याच्या कामाबाबत महापालिकेने हात वर केल्याने आता पुढील लक्ष्य बांधकाम विभाग असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्याची कामे लवकर सुरू न झाल्यास बांधकाम विभागावर मोर्चे काढण्यासह महापालिकेच्या निवडणुकीसह आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याच्या भावना करदात्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.