तरुण भारत लाईव्ह । कडू महाजन । धरणगाव, जि. जळगाव : ‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’ , या पंक्तीप्रमाणे धरणगावातील मुन्नादेवी, मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशनचे काम सुरू आहे. संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निराधारांना विनाशुल्क भोजन पुरविण्याचे काम अविरतपणे करत आहे.
समाजात अनेक वृद्ध महिला, पुरूष असे असतात की त्यांना पोटाची खळगी भरणे शक्य नसते. वृद्धापकाळाने काम करणेही शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी धरणगावातील मुन्नादेवी आणि मंगलादेवी संस्था मोठा आधार ठरत आहे. संस्थेचे प्रमुख विश्वस्त जीवन बयस हे राजपूत समाजाचे अध्यक्ष आहेत. जिनिंग व्यावसायिक म्हणून त्यांचा लौकिक आहे. धरणगावात बांधण्यात येणार असलेल्या श्री बालाजी मंदिर देवस्थाचे प्रमुख म्हणूनही ते जबाबदारी सांभाळून आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बयस यांनी समाजातील गोरगरीबांना आधार ठरेल असे काही उपक्रम धरणगाव शहरात सुरू केले आहेत. त्यात 55 ते 60 गोरगरीब वृद्धांना ते आधार ठरत आहेत. त्यांना या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव मुकेश बयस यांचेही सहकार्य लाभत असते. तर घरपोच डबे वाटपासाठी जितू चौधरी, दुर्गेश बयस, नामदेव मराठे हे मदत करत असतात.
समाजाचं देणं…
ज्याला कोणी नाही त्याला आमचा आधार या उदात्त हेतून ही संस्था विविध उपक्रम राबवत असते. एकंदरीत ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे काही देणं लागतो हीच भावना यामागे असल्याचे संस्थेचे विश्वस्त जिवन बयस हे सांगत असतात. दिवाळीत गरीबांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहेर्यावर दिपोत्सवाचा आनंदाचा प्रकाश टीपणे यासह विविध उपक्रम आम्ही राबवत असल्याचे मदत करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत असतात.
शेतकर्यांना मदत
देणार्याचे हात घ्यावे म्हणजेच समाज जसा आपल्याला देतो तसेच आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो. याच उद्देशाने एकत्र येऊन संस्थेतील विश्वस्तांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गोरगरीबांना जेवणाचे डबे पुरवत असताना जळगाव रोडवरील जिनींगमध्ये येणार्या शेतकर्यांसाठीही ही संस्था आधार ठरत आहे. ग्रामीण भागातून असंख्य शेतकरी कापूस घेऊन या ठिकाणी येत असतात. सकाळी लवकर निघावे लागत असल्यामुळे अनेक जण जेवणाचा डबा आणू शकत नाही. अशा शेतकर्यांना ही संस्था अतिशय अल्प दरात जेवण देत असते. यासह जिनींगमध्ये कामासाठी शेकडो मजुर ग्रामीण भागातून येत असतात. त्यातील बरेच पहाटे लवकर निघावे लागते म्हणून डबा आणू शकत नाही. अशा मजूर वर्गासाठीही ही संस्था मदत करीत असते.