भुसावळ/शिंदखेडा : अनैतिक संबंधातून झालेल्या वादानंतर मारहाणीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे मंगळवार, १७ रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दीपक रतीलाल मालचे (२५, शेवाळे, ता. शिंदखेडा) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
अनैतिक संबंधानंतर वाद
सूत्रांच्या माहितीनुसार, शेवाळे गावातील दीपक मालचे या तरुणाचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. १६ रोजी मध्यरात्रीनंतर नीळकंठ सोनजे यांच्या शेतात उभयतांमध्ये भेट झाली, मात्र त्यानंतर दीपक मालचे याने महिलेला तुझे कुणासोबत आणखी संबंध आहेत म्हणून विचारणा केल्याचा राग आल्यानंतर महिलेने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गुप्तांगावर लाथा मारल्याने दीपक मालचे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रतीलाल न्हानू मालचे (४५, शेवाळे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी महिलेविरोधात शिंदखेडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिकाऱ्यांची धाव
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक भगवान सोनवणे, शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, सहा. निरीक्षक हनुमंत गायकवाड आदींनी भेट दिली. दरम्यान, आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.