जळगाव : अडावद गावालगत असलेल्या मुस्लिम कब्रस्थानजवळ एक ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
चोपडा तालुक्यातील अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास एक व्यक्ती मयत अवस्थतेत आढळून आला. याबाबतची माहिती अडावदचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्थानकात फोनद्वारे दिली. मृत व्यक्ती ही जगदिश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा. पाटचारी,अडावद ता. चोपडा) असल्याचे उघड झाले. जगदीश यांच्या अंगावर मारहाण झाल्याचे व्रण दिसत होते. यासोबत डोक्यावर, कपाळावर तसेच कानावर गंभीर प्रकारच्या जखमा, गळा आवळल्याचे व्रण होते.
मयताचा मुलगा ईश्वर जगदिश सोलंकी (वय २०) याच्या फिर्यादवरुन अज्ञात आरोपीविरुध्द अडावद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सपोनि प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि वाघमारे व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा चौघा संशयित आरोपी इरफान अब्दुल तडवी, शहारुख इस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजिद, कलिंदर रशिद तडवी (सर्वांचे वय २० ते २५, रा. अडावद) यांची नावे पुढे आली. पोलिसांनी जगदीश यांच्या शेवटच्या लोकेशनचा अभ्यास करत चौघांना अटक केली.
जगदीश सोलंकी यांनी मुस्लिम कब्रस्थानाजवळ चौघांना “तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत” असा जाब विचारला. याचा संशयित आरोपीना राग आला. त्यांनी जगदीश सोलंकी याच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले. तेव्हा जगदीश हा पळु लागल्याने त्यास कब्रस्थान मधिल बांधकाम केलेल्या व्हरांडयात व रुममध्ये संशयित घेवुन गेले. तेथे लाठ्या काठयाने मारहाण केली. तसेच संशयित आरोपी कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळुन ठार मारले. प्रेत उचलुन हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर आणुन टाकले आहे. अशी माहिती संशयीत आरोपींकडून पोलिसांना प्राप्त झाली आहे.
संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि.१० सप्टेंबर रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ व अडावद पोलीस करित आहेत.
अडावद पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा अत्यंत मेहनतीने केला असे सांगून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी तपासपथकाला बक्षीस देऊन गौरविले.