नंदुरबार : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, म्हणून याचा राग येऊन बापानेच अवघ्या चार महिन्याच्या बालिकेचा जमिनीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच संशयित आरोपीनं पत्नीला देखील मारहाण केले. याप्रकणी म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथे ही घटना घडली आहे. सोमनाथ सुकलाल पाडवी (२४. रा. लक्कडकोट, ता. शहादा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर रुचिता सोमनाथ पाडवी (चार महिने) असे मयत बालिकेचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, संशयित सोमनाथ पाडवी याने पत्नी भारती हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तिने ते दिले नाहीत. याचा राग येऊन सोमनाथ याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर खाटेवर झोपलेल्या अवघ्या चार महिन्याच्या बालिकेला उचलून तिचा गळा दाबून तिला जमिनीवर आपटले. त्यात तिचा मृत्यू झाला.
याबाबत भारती हिने म्हसावद पोलिसात फिर्याद दिली, त्यानुसार संशयित सोमनाथविरुद्ध म्हसावद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निवृत्ती पवार करीत आहे.