मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्या आली. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे पूर्व भागात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मल नगरमधील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. यावेळी लगेचच दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गोळीबार करणाऱ्यांपैकी एक उत्तर प्रदेशचा, दुसरा हरियाणाचा तर तिसरा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी ट्विटरवरील शोकसंदेशात हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन केले आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दोन शूटर्सना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. घटनेनंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळातच लीलावती रुग्णालयात पोहोचले.
बाबा सिद्दीकी हे तीन वेळा आमदार राहिले होते. त्यांनी नुकतेच काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनावर विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला तर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.
बाबा सिद्दीकी यांचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की त्यांच्याकडे शब्द नाहीत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले नेते अशोक चव्हाण म्हणाले की, दोघेही काँग्रेसमध्ये असताना सिद्दीकी यांच्यासोबत काम केले होते.
काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी X वरील एका पोस्टमध्ये सांगितले की, युवक काँग्रेसच्या काळातील त्यांच्या प्रिय मित्राच्या निधनाने मला धक्का बसला आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट झाली आहे, हे चिंताजनक आहे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले.