तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । लव्ह जिहादविरोधी तसेच धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येसारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यासह विविध मागण्यांसाठी सातारा येथे विविध हिंदू संघटनांनी आज रविवारी विरोट मोर्चा काढला.
मोर्चाद्वारे विविध मागण्यांना वाचा फोडत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाजाच्यावतीने गांधी मैदान, गोलबाग राजवाडा सातारा मैदानातून रविवारी सकाळी दहा वाजता या विराट मूक मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली.
धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब पुनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या प्रत्येक व्यक्ती, संघटना, राजकीय पक्षांवर कारवाई करण्यात यावी, या आणि अशा विविध मागण्या विराट मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चा जात असलेल्या मार्गावरून दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत मोर्चाला पूर्ण समर्थन दिले.
हा विराट मोर्चा शहरातून विविध मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.