Jalgoan Crime News । जळगावात दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू

जळगाव । महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांचे मतदान होत आहे. अशातच जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आपापसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. ही घटना या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ माणिक वानखेडे ( ३६, रा. राजमालती नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजमालती नगर व जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील राजमालती परिसरात आज सकाळी ६ वाजता जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात सिद्धार्थ माणिक वानखेडे (३६, रा. राजमालती नगर ) याला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

तर विशाल अजय सुरवाडे (२८),  जानू संजू पाटील(२०,), फैजन राजू पाटील (२४) व मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल (४२ सर्व रा. राजमालती नगर) हे सर्व जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणातील ७ ते ८ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.