Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे झालेल्या भयावह हिंसाचारामुळे जवळपास ५०० हिंदूंनी येथून पळ काढत मालदा येथे आश्रय घेतला आहे. मुर्शिदाबादेतून पळ काढणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी मालदा येथील एका शाळेत आश्रय घेतला आहे. आमची घरे जाळली, पाण्यात विष मिसळण्यात आले, असे या लोकांनी सांगितले. दरम्यान, मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी आणखी १२ आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींचा एकूण आकडा १५० झाला आहे.
मालदा ग्रामीणमधील पारलालपूर हायस्कूलमध्ये ५०० पेक्षा जास्त लोकांनी आश्रय घेतला आहे. त्यात महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकांनी मुर्शिदाबाद येथील घरदार सोडून पळ काढला आणि नौकेचा वापर करीत ते मालदा येथे पोहोचले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. मालदा येथे आश्रय घेतलेल्यांत नवजात मुलांपासून ते वृद्ध महिलांचा समावेश आहे.
जीव वाचवीत पळून आलो
सध्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक लोक करीत आहेत. मात्र, मुर्शिदाबाद येथून पळ काढणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मुर्शिदाबादच्या धुलियान येथून लोकांनी मोठ्या प्रमाणात पळ काढला. ते नौकांच्या मदतीने मालदापर्यंत पोहोचले. आमच्या पाण्यांच्या टाक्यांमध्ये विष मिसळण्यात आले. लुटल्यानंतर घरे जाळण्यात आली. आम्ही कसाबसा जीव वाचवून पळ काढून आलो, असे लोकांनी सांगितले