जळगाव : धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी दि. 2 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार सोनवणे व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात जिजाबाई शंकर पाटील यांना घरकुल देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
त्याअनुषंगाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी तातडीने कार्यवाही करून राज्य पुरस्कृत मोदी आवास योजना (State sponsored Modi Awas Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून दिले. योजनेच्या निकषांनुसार घरकुल उभारणीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य वेळेत उपलब्ध करून दिले गेले, त्यामुळे घरकुलाचे काम लवकर पूर्ण झाले.
घरकुलामुळे लाभार्थ्याचा आनंद
मोदी आवास योजनेच्या माध्यमातून उभारलेले घर पूर्ण झाल्यानंतर सौ. जिजाबाई शंकर पाटील यांनी शासनाचे आभार मानले. “जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आणि आम्हाला हक्काचे घर मिळाले. यासाठी प्रशासनाने वेळेवर मदत केल्यामुळे आमचे स्वप्न साकार झाले,” असे त्या म्हणाल्या.
स्थानिक प्रशासनाची तत्परतागावातील पात्र लाभार्थ्यांना गृहसुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. घरकुल योजनेसाठी दिले जाणारे अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय योजना पूर्ण करता आली.
प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन
धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून घरकुल कामाला गती
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या घरकुलच्या कामावर स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्या गावोगावी दौरे करत आहेत. त्यामुळे यंत्रणेला गती आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुल पूर्ण होत आहेत.