---Advertisement---

म्यानमार भूकंपाने हादरले! ६९४ जणांचा मृत्यू, १५०० जण गंभीर जखमी; आणीबाणी जाहीर

by team
---Advertisement---

नेपिता : २८ मार्च शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी भारताचे शेजारी म्यानमारसह थायलंडला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ७.७ इतक्या तीव्रतेच्या धरणीकंपाने अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. म्यानमारमध्ये प्रचंड नुकसान झाले असून या भूकंपात आतापर्यंत ६९४ जणांचा मृत्यू झाला तर १५०० अधिक जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भारत, बांगलादेश आणि चीनच्या काही भागालाही हादरे बसले.

त्याच वेळी, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली. या ठिकाणी ४०० लोक काम करत होते. यापैकी ८० लोक बेपत्ता आहेत, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे मंडाले शहरात बांधलेली मंदिरे आणि अनेक घरे उध्वस्त झाली. म्यानमारमधील ऐतिहासिक राजवाडा असलेल्या मंडाले पॅलेसच्या काही भागाचे नुकसान झाले. त्याचवेळी भूकंपात सागाइंग प्रदेशातील सागाइंग टाऊनशिपमधील एक पूल पूर्णपणे उध्वस्त झाला.

म्यानमारशिवाय बँकॉकमधील अनेक इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. बांधकामाधीन काही इमारती क्षणार्धात भंगाराचे ढीग बनल्या. भूकंपामुळे पूल, मोठ्या इमारतींचे अतोनात नुकसान झाले असून रस्तेही खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्याने वाहतूक खोळंबली आहे. लोक रस्त्यांवर चालण्यासही घाबरत आहेत. या पाच देशांच्या वेगवेगळ्या भागात शेकडो लोक घाबरून घरे आणि कार्यालये सोडून पळून गेले. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थापलंडचे पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

महाभूकंपाचे कारण ‘सागांग फॉल्ट’

दोन तीव्र धक्क्यांनी हादरलेल्या म्यानमारमध्ये महाविनाशाचे चित्र दिसत आहे. म्यानमारमध्ये इतक्या तीव्र क्षमतेचा भूकंप का झाला, याचे उत्तर तेथील भूगर्भात दडले आहे. म्यानमारमध्ये जमिनीला बसलेल्या हादन्याचे कारण सागांग फॉल्ट आहे. सागांग फॉल्ट म्हणजे जिथे पृथ्वीचे दोन भूभाग एक दुसऱ्यावरून घसरतात. हे घर्षण दरवर्षी ११ एमएम ते १८ एमएम इतके होत असते. दोन्ही भूभाग घसरत राहिल्याने नेहमी भूगर्भात तणाव वाढतो. आता हे भूभाग घसरण्याचा वेग प्रतिवर्ष १८ एमएमपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अधिक ऊर्जा जमा होत आहे. हीच ऊर्जा मोठ्या भूकंपाच्या स्वरूपात बाहेर ■पडते. नेमके हेच शुक्रवारी म्यानमारमध्ये घडले.

भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, म्यानमार, थायलंड, बांगलादेशात आलेल्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अतिशय दुःख झाले आहे. तेथील नागरिक सुरक्षित राहावे अशी प्रार्थना करतो. भारत भूकंप पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे. मी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडमधील सरकारच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ते त्यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment