नंदुरबार : येथील जिल्हा परिषदेंतर्गत महिला व बालविकास विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा फुलसिंग राठोड यांच्या दालनात जाऊन ठेकेदार पंकज लोटन कंखर यांनी शिवीगाळ व धमकी दिली, असे लेखी पत्र कृष्णा राठोड यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, अधिकारी राठोड यांच्याकडून मक्त्यातून ३० टक्क्यांची मागणी केली जात असल्याचा ठेकेदाराने आरोप केला आहे.

जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले
आहे की, पंकज लोटन कंखर हा जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांत काढण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या कामांचा ठेकेदार आहे. तो गुंडप्रवृत्तीचा असून, जिल्हा परिषदेतील कामे मिळविण्यासाठी राजकीय दबाव आणतो. प्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून अनधिकृतपणे कामे मिळविण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, बुधवारी (४ जून) ते कार्यालयात कर्तव्यावर असताना पंकज लोटन कंखर हा दुपारी दीडला आला.
त्याने महिला व बालविकास विभागांतर्गत राबवावयाच्या प्रस्तावित योजनांची कामे त्यास द्यावीत, यासाठी तगादा सुरू केला. माझी ओळख मोठमोठे अधिकारी व मंत्र्यांशी आहे, म्हणून तुम्ही तुमच्या विभागांतर्गत ज्या योजना राबविण्यात येणार आहेत, त्या सर्व योजनांची कामे मला द्यावीत. त्यावर त्यास स्पष्ट नकार दिल्याचा राग येऊन त्याने उद्धटपणे अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ व धमकी दिली. तुमच्या तंगड्या तोडून टाकेल, माझे तुम्ही काय पण कुणीही काहीएक वाकडे करू शकणार नाही, तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली. तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न करून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
त्या वेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याची समज काढून त्यास कार्यालयाच्या बाहेर काढले. अशा गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीपासून जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे पत्रात नमूद करीत संबंधितावर कारवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी कृष्णा राठोड यांनी केली आहे.
ठेकेदार पंकज लोटन कंखर याने आपली बाजू मांडतांना सांगितले की, जिल्हा परिषदेंतर्गत महिला व बालविकास विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा फुलसिंग राठोड हे दहा लाखांचे काम मंजूर होते. मात्र, ते देत नव्हते. एक महिन्यापासून रोज त्यांच्या दालनात जाऊन विनंती करीत होतो. ते आमच्याकडे ३० टक्क्यांची म ागणी करीत होते. मी कोणत्याही प्रकारची शिवीगाळ त्यांना केली नाही. त्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविले आहेत. त्यांनी खोटे आरोप आमच्यावर केले आहेत.