तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी फक्त ५ तासांत कापता येणार आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच विदर्भातील आमदार खासदार उपस्थित राहतील. महामार्गावरील वायफड नाक्याजवळ लोकार्पण सोहळ्यासाठीचं सभास्थळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी काही किलोमीटरचा प्रवास करतील तसेच छोटेखानी सभेला संबोधितही करतील. या सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी मुंबईच्या एका कंपनीकडे देण्यात आली आहे.
खरं तर या समृद्धी महामार्गाचं महाराष्ट्र दिनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. मात्र तो मुहूर्त हुकला. आता सत्तांतरानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या हायवेचं भव्य उद्घाटन होतंय. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा साक्षीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमु्ख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.