धुळे : मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रस्त्यावर घडली. सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (वय ४५) व मंगलाबाई अभिमन जाधव ( वय ४४) असे मयत महिलांचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक जात आहेत. त्यातच शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील जनता नगर भागातील महिला पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेत सहभागी होण्यासाठी जायला निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या जेवणासाठी देवास बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या. जेवण झाल्यानंतर रस्ता क्रॉस करत असतांना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई अभिमन जाधव ( वय ४४) या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची नणंद सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (वय ४५) या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हा अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या धडकेत सुनंदाबाई या जागीच ठार झाल्या. तर मंगलाबाई गंभीर जखमी झाल्याने, त्यांना तत्काळ शिरपूर येथील कॉटेज रूग्णालयाात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच परिवारातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.