Nandurbar Accident News : खड्डे वाचवितांना बसचा अपघात, विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक जखमी

नंदुरबार :  जिल्हा आदिवासी दुर्गम भाग आहे.  जिल्ह्यात शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव जाण्यासाठी आणि जवळ असलेले गुजरात राज्याला आणि मध्यप्रदेश राज्यांना जोडणारे महत्त्वाचे महामार्ग आहेत. या महामार्गांवरील खड्ड्यांबाबत अनेक वेळा विविध सामाजिक संघटना राजकीय पदाधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार केली होती. मात्र, तरीदेखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही.

अशाच प्रकारे रस्त्याची दुरावस्था झालेल्या तळोदा तालुक्यात खड्डे वाचवताना बस उलटून अपघात झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या अपघातात काही विद्यार्थी आणि वृद्ध प्रवासी यात जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार एसटी महामंडळाची तळोदा धनपूर बस ही रांजणी रस्त्यावरून धावत होती. ती अचानक उलटली आणि रस्त्याच्या पलीकडे झाडाझुडपात जाऊन पडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी घाबरले.  त्यांनी जीवाच्या अकांताने  आरडाओरड ऐकून अन्य वाहनधारक धावून आले. मिळेल त्या वाहनाने जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त बस अक्कलकुवा आगाराची आहे.  बस क्रमांक एम. एच. 20 बीएल 1995 आहे. धनपूरकडे जाताना ही बस रांझनी फाट्याजवळील विट पजावा जवळ रस्त्यालगत उलटली. काही विद्यार्थी आणि वृद्ध प्रवासी यात जखमी झाले तथापि कोणतीही प्राणहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग केले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्गाची भीषण अशी दुरावस्था पाहायला मिळत आहे.  तरी देखील राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभाग या गोष्टीकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. वारंवार तक्रार करुन देखील लक्ष न दिल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. या अपघाताला जबाबदार कोण? असाच प्रश्न आता सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.