नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोजरापाडा (त्रिशूल ) येथे २६ वर्षीय विवाहितेचा पतीने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे चार वाजता पतीने विवाहितेचा खून केला होता. खुनानंतर पतीसह सासरच्यांनी गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला होता. रोशनी दिलवरसिंग वसावे (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
रोशनी यांचा पती दिलवरसिंग हा नेहमी दारू पित असल्याने दोघांचे कायम भांडण होत होते. या भांडणातून सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दिलवरसिंग याने पत्नीचा गळा दाबून तिचा खून केला. हा गुन्हा लपविण्यासाठी त्याने रोशनी यांचा मृतदेह माळ्यावर चढविला होता. याप्रकरणी रवींद्र रोता वसावे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिलवरसिंग नानटा वसावे (३०), ईश्वर सेवा वसावे (२०) व रुपा हुका वसावे (४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
दरीत कोसळले वाहन
नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ (ता. धडगाव) परिसरातील झापी घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेदरम्यान घडली. अपघातात ५ जण जखमी झाले असून, वाहन दरीत कोसळून त्याचा चुराडा झाला आहे.
सातपुड्यात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे डोंगरी भागातील रस्ते निसरडे झाले आहेत. मंगळवारी दुपारी झापी घाटातून प्रवासी वाहन मार्गस्थ होत असताना चालकाचा ताबा सुटला. यामुळे वाहन तीव्र उतारावरून दरीकडे झेपावले, यावेळी प्रवाशांनी उड्या मारल्याने त्यातील पाच जण जखमी झाले.