नंदुरबार : जुन्या वादातून चौघांनी एकाचे घर जाळून घर मालकास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सरीचा गौरीखालपाडा, ता. अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात मोलगी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घराचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सरीचा गौरीखालपाडा येथील शिवाजी खेमा वसावे व भीमसिंग वीरजी वसावे यांच्यात जुना वाद होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच धुसफूस चालत होती. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला व त्याचे पर्यावसान जाळपोळ करण्यात झाले. रागाच्या भरात भीमसिंग वसावे व इतर तिघांनी शिवाजी यांच्या घरालाच आग लावून पेटवून दिले. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
याबाबत शिवाजी वसावे यांनी फिर्याद दिल्याने भीमसिंग वीरजी वसावे, धरमसिंग वीरजी वसावे, दिनेश वीरजी वसावे व मंगलसिंग राज्या वसावे सर्व रा. सरीचा गौरीखालपाडा, अक्कलकुवा ता. यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार युवराज रावताळे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीच्या घटनेत घराचे आणि आतील सामानाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
वीज पडून एकाचा वडगावला मृत्यू
शहादा : वडगाव, ता. शहादा येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत शहादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुखदेव दशरथ पावरा (३२, रा. तलावडी, ता. शहादा) असे मयताचे नाव आहे. घरबांधकाम करीत असताना सोमवारी सायंकाळी अचानक अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला तर सुजीत पावरा हा बालक जखमी झाला. तालुक्यात आठवड्यातील दुसरी घटना घडली.