नंदुरबार.. मृतावस्थेत आढळला बिबट्या

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । शहादा तालुक्यातील म्हसावद पिंप्री शेत शिवारात बुधवारी सकाळी १० वाजता मादी बिबटया मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत राणीपूर वनविभागात याची नोंद करण्यात आली.

शेतकरी संजय श्रीपत पाटील यांनी वनविभागात माहिती दिली. पाटील यांचे पिंप्री येथील कन्हेरी नदीला लागून शेत असून यात केळी लावलेले पिकक्षेत्र आहे. ते नेहमीप्रमाणे दि.७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शेतात फेरफटका मारत असताना त्यांना बिबटया मादी मृतावस्थेत आढळून आली. ते शेतातून घाबरून गावात परत आले. त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. तात्काळ राणीपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण कर्मचार्‍यांसह दाखल झाले. त्यांनी शेतीच्या परिसरात पाहणी केली असता त्यांना काहीही आढळून आले नाही.

मृत बिबटया भक्ष्य शोधण्यासाठी आला असेल व याठिकाणी मयत झाला असेल असा अंदाज आहे. मृत बिबटया मादी दीड ते दोन वर्षांची आहे. मृत बिबट्याचा जागेवरच पंचनामा करण्यात आला. डॉ.सुभाष मुखडे यांनी राणीपूर येथे शवविच्छेदन केले. मादी बिबटयाचा कशामुळे मृत्यू झाला याचा अहवाल आल्यावर समजेल.

घटनास्थळी शहादा वन संरक्षक संजय साळूंखे, तोरणमाळ परिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल महेश चव्हाण, शहादा वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, तोरणमाळ वनपाल संजय पवार, वनपाल राणीपूर विजय मोहिते, राधेश्याम वळवी, वनरक्षक एस.एम.पाटील, सुभाष मुखडे व कर्मचार्‍यांनी भेट दिली.

दरम्यान, म्हसावद पिंप्री, चिखली कानडी, बुडीगव्हाण, पाडळदा.कलसाडी आदी गावाकडे बिबट्या मुक्त संचार करीत असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.