Nandurbar News : गावाला निघाले अन् काळाचा घाला, भरधाव आयशरने माय-लेकाला चिरडले

अक्कलकुवा  : भरधाव आयशरच्या धडकेत माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बिजरीगव्हाण येथे ११ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. सोमीबाई सुभाष वसावे व मुलगा सुशील सुभाष वसावे, असे मयतांचे नावं आहे. या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चिवलउतार ह.मु. पांढरामाती (ता.अक्कलकुवा) येथील रहिवासी सुभाष मोत्या वसावे हे मयत पत्नी व मुलगा यांच्यासोबत  मोलगी येथून दुचाकीने गावी पांढरामाती येथे ११ रोजी १२.३० च्या सुमारास जात होते.

बिजरीगव्हाण गावाजवळील वळण रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या आयशरने (एमएच.१२.डब्ल्यूजे.७४०३) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पत्नी व मुलगा चिरडले गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुभाष वसावे गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात सुभाष वसावे यांच्या फिर्यादीवरून आयशर चालक मिलन अंबादास गवई वय रा.खंडाळा जि.अकोला यांच्यावर गुरनं.९९/२०२४ भा.न्या.सं.कलम १०६(१),२८१,१२५(अ),१२५(ब), ३२४(४), मो.वा.का.कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई सागर आधार गाडीलोहार करीत आहे.