Nandurbar News : चांदशैली घाटात अपघात, चालकाच्‍या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना

नंदूरबार : तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात आज प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्‍याने अपघात झाल्‍याचे सांगितले जात आहे. यात सात जण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

नंदुरबार जिल्‍ह्यातील चांदशैली घाटावर धोक्‍याचे वळण आहे. याच घाटात प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहन धडगाववरून तळोद्याकडे येत होते. यादरम्‍यान घाटातील वळण रस्त्याजवळ वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट घाटातील दगडावर धडकले. यात प्रवास करत असलेले सात प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर तळोदा  उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करुन सोडून देण्यात आले.

मोठी दुर्घटना टळली
सुदैवाने बाजुला दरी असताना वाहन चालकाने प्रसंगावधानता दाखवत विरुद्ध दिशेला वाहनाला वळवत मोठ्या दगडाला धडक मारली. अन्‍यथा वाहन खोल दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यात मोठी जीवितहानी होण्याची देखील शक्‍यता होती.