नंदुरबार : तालुक्यातील एका आश्रम शाळेतील २ रीचा निवासी विद्यार्थ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नंदुरबार शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील लोय गावातील आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेतील इ.२ री चा निवासी विद्यार्थी मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) या चिमुकल्यावर हल्ला करून हिंस्त्र प्राण्याने ठार केल्याची दुर्दवी घटना घडली आहे.
शासनाने प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या पालकांना सुमारे दहा लाखाची तातडीची रोख मदत जाहीर केली आहे. शासकीय नियमानुसार २५ लाख रुपये रोख भरपाई देण्यात येते. त्यापैकी ही तातडीची दहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोय गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थी मनोहर वसावे हा गुरुवार २९ रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह छिनविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने याचिमुकल्यास बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून ठार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हे वृत्त कळताच वन खात्याचे अधिकारी यांनी तातडीने पाहणी केली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार यांनी मयत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घटनेची माहिती घेतली.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय येथे गुरुवार दि २९ रोजी पहाटे सुमारे ६ वाजेच्या दरम्यान इ. २ री चा निवासी विदयार्थी मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) या विदयार्थ्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. मनोहर जखमी असल्याबाबत चौकीदार यांनी मुख्याध्यापक माळी यांना कळविले. मुख्याध्यापकांनी पाहणी केली असता विदयार्थ्याच्या गळयावर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरु असल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे तातडीने विद्यार्थ्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले.