नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात तब्बल तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यात दोन, तर धडगाव तालुक्यातील एक जणाचा समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना मोठे पूर आले आहेत. दरवर्षी अक्कलकुवा- धडगाव तालुक्यात पावसाळा चांगला असतो. त्यामुळे डोंगरदऱ्यातून पाणी वाहून येत ते नदी नात्यांमध्ये मिळते, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहतात. याचा अंदाज या परिसरातील प्रत्येकाला असतो. मात्र तीन दिवसात झालेला पाऊस मुसळधार होता. त्यामुळे नदी नाल्यांमध्ये केव्हा पाणी वाढून पूर येईल हे सांगणे कठीण झाले आहे. तसे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र नेहमीप्रमाणे अनेक जण जोखीम पत्करून नदी-नाले पार करतात. तसाच प्रकार या तीन दिवसात जिल्ह्यातील अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यात घडले आहेत. धडगाव तालुक्यातील माळचा गेंदा येथील बायसिंग बहादूर पावरा हे पुरात वाहुन मृत झाले आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील गुली अंबरचे रहिवाशी असलेले संतोष रमेश वसावे पुराच्या पाण्यात वाहून गेले तर अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बडर्डी येथील शासकीय आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक असलेले ईश्वर रामा वसावे (रा. गमन) हे रोयाबारीपाडा येथील दुकानावरून किराणा घेऊन आपल्या घरी परत जाताना रस्त्यातील नदी ओलांडत वाहून गेले होते. त्यांच्या मृतदेह सकाळी आढळून आला. जिल्ह्यातील तीन जणांचा नदीचा पुराचा पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत अक्कलकुवा व धडगाव पोलिसाच नोंदीचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
४२ घरांची पडझड
दरम्यान, सततधारेमुळे जिल्ह्यातील ४२ घरांची पडझड झाली आहे. त्यात अनेकांचा संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नुकसानीच्या पंचनाम्यांची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.