नंदुरबार : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाहातून एका तरुणाची धारदार शस्त्र भोकसून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अरबाज खाटीक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीला पळवून नेत विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावाने तिच्या पतीची हत्या केली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षकांसह सर्व पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, घटनेनंतर आरोपी हा स्वत:पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. मात्र अधिक खबरदारीसाठी नंदुरबारमध्ये आज शनिवारी अतिरिक्त कुमक सह मोठा पोलीस फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.