उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या नार-पार-गिरणा नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २,३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, तापी महापुनर्भणासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा खर्च ७ हजार १५ कोटी २९ लाख रुपये आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून ९.१९ टीएम सी पाणी उचलून १४.५६ किलोमीटर बोगद्याद्वारे गिरणा नदीपात्रात चणकापूर प्रकल्पाच्या वरच्या बाजूस पाणी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना सिंचनासाठी फायदा होणार आहे. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास शासनाकडून यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, निविदा काढण्यात आली आहे.
४९ हजार ७६१ क्षेत्राला लाभ
नार पार प्रकल्पाचा खर्च ७हजार १५ कोटी २९ लाख रुपये आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलून १४.५६ किमी बोगद्याद्वारे गिरणा नदीपात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल. यामुळे ४९ हजार ७६१ क्षेत्र सिंचित होणार आहे. राज्यात १६० प्रकल्पांना फ रप्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंचनाचे प्रकल्प वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार-२ या योजनेची अंमलबजावणी तसेच नदीजोड प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पातून सिंचनासाठी ४९ हजार ७६१ क्षेत्राला फायदा होणार असून, १० पाणीवापर संस्था प्रस्तावित आहेत. खान्देशाला संजीवनी ठरणाऱ्या या प्रकल्पाला चालना दिल्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन करीत आभार मानत असल्याचे माजी आमदार चिमणराव पाटील यांनी म्हटले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती
जिल्ह्यात १५ तालुके असून, सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना उपबाजार आवार तसेच जोडलेल्या संलग्न असलेल्या तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेणे क्रमप्राप्त आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीस मंजुरी देण्यात येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ अशा ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, तर उर्वरित भडगाव-पाचोरा, धरणगाव-एरंडोल आणि मुक्ताईनगर-बोदवड या ठिकाणी तालुक्याचे ठिकाण असले, तरी संलग्न तालुक्यांतर्गत उपबाजार समिती आवार कार्यान्वित आहेत. भडगाव तालुक्यात कजगाव, तर पाचोरा तालुक्यात नगरदेवळा आणि वरखेडी असे उपबाजार आवार आहेत. जळगाव तालुक्यात म्हसावदअंतर्गत उपबाजार आहे.