जळगाव : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णायक स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून महिलांना ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील मोफत अर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यासोबतच अंगणवाडी सेविका,बचत गट, समूह संघटक, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून देखील महिलांना अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरून देण्याचा प्रोत्साहन प्रत्येकी अर्ज पन्नास रुपये त्यांना दिला जाणार असल्याने कोणीही महिलांनी हे अर्ज भरण्यासाठी आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासोबतच या योजनेच्या अंमलबजावणीत सुटसुटीत पणा यावा या दृष्टीने शासनाने नवीन शासन निर्णयाद्वारे बदल केले आहेत. गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून समितीमार्फत दर शनिवारी चावडी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन होणार आहे.
या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची कोणतीही फरपट होऊ नये, त्यासोबतच त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू नये या दृष्टीने नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून मोबाईलद्वारे महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. नारी शक्ती दूत या ॲपवरून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र बरेचदा नेटवर्कचा अभाव तसेच काही तांत्रिक बाबींमुळे महिला अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या तेव्हा अर्ज दाखल झाला नाही तरी काही वेळाने अर्ज दाखल करता येऊ शकतो. कोणतीही लाभार्थी महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या दृष्टीने शासनाने विविध पावले उचलले आहेत. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी ऑफलाइन पद्धतीने ग्रामपंचायत दिलेले अर्ज टप्प्याटप्प्याने ऑनलाईन करण्यात येतील.
अर्ज दाखल करताना व ऑनलाइन माहिती भरताना अचूक माहिती भरावी. याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. विशेषत: आधार कार्ड, बँक खात्याशी संबंधित माहिती अद्ययावत तसेच अचूक भरावी जेणेकरून लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ होईल. योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांना देखील अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेल याबाबत ग्राम स्तरावर खात्री करावी अश्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सर्व ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी व क्षेत्रीय यंत्रणांना दिल्या आहेत.