नंदुरबार :नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शाळा उपक्रमांंतर्गत १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान प्रशिक्षण आयोजित केले आहे. मुलांना गोष्टी का सांगाव्यात यासह इतर विषयांवर मुलांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाईल.
१० रोजी ओळख, खेळ, गाणी, मुलांना गोष्टी का सांगाव्यात? त्यासाठी गोष्ट कशी सांगावी, गोष्ट सांगण्याच्या तंत्राची तोंडओळख, गोष्टींमध्ये आवाजाचा वापर कसा करावा? गोष्ट सांगण्याची पूर्वतयारी, गोष्ट सांगण्याच्या जगभरातील पद्धती यावर चर्चा होईल.
दुसर्या दिवशी ११ रोजी गोष्टीमधील पात्र उभी कशी करावीत, गोष्टीची फोड कशी करावी, गोष्ट सांगताना वापरले जाणारे घटक व त्यावर चर्चा होईल. गोष्ट सांगताना काय करावे व करू नये हे समजून घेताना ताराबाई मोडक ह्यांच्या गोष्टी सांगणार्यांसाठी चार गोष्टी ह्या पुस्तकावर आधारित काम, तसेच गोष्टीच्या नाट्यकरणाचा सराव होईल. रात्री नाट्यप्रयोग होईल.
तिसर्या दिवशी १२ रोजी पुस्तक कसे निवडावे, त्यासाठीचे निकष कोणते?, चांगले वाचक मजकुराचा अर्थ कसा लावतात, शब्दोच्चार, पुस्तक वाचण्यापूर्वी किंवा वाचनानंतर कोणते उपक्रम घेता येतील? वाचत असताना मुलांना विचार प्रवृत्त करण्यासाठी कुठे व कोणते प्रश्न विचारता येतील? यावर सादरीकरण होईल.
मुलांचे वर्गातील लक्ष कमी
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये कोविड पूर्व काळापासून काम सुरू आहे. हे करत असताना असे जाणवले आहे की, कोविडनंतर मुलांचे वर्गात लक्ष देऊन शिकण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, नंदुरबार ऍड. योगिनी खानोलकर यांनी सांगितले. यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.