तरुण भारत लाईव्ह।१४ जानेवारी २०२३। ब्रिटिशकाळातील पाचोरा-जामनेर नॅरोगेज लोहमार्गाचे परिवर्तन ब्रॉडगेजमध्ये करण्यात येणार आहे. तसेच पीजे अर्थात पाचोरा जामनेरऐवजी जामनेरपासून पुढे बोदवडपर्यत लोहमार्ग जोडला जाणार असल्याने या लोहमार्ग परिसराची पाहणी भुसावळ विभागाचे मंडळ रेल प्रबंधक एस.एस. केडिया यांच्या पथकाने पाहणी केली. भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम केडिया यांच्या पथकाने भुसावळ ते पाचोरा टॉवर वॅगनव्दारा पाहणी केली. तसेच पाचोरा ते जामनेर लोहमार्गाची पाहणी ठिकठिकाणी रस्तेमार्गाव्दारे केली.
दरम्यान, पाचोरा जंक्शन स्थानकावरील नॅरोगेज लोहमार्गावरील फलाट, सी अॅण्ड डबल्यू सेक्शन आणि लोहमार्गावरील वरखेडी, शेंदुर्णी, पहूर स्थानकांवर भेट येऊन पाहणी केली. पाचोरा-जामनेर लोहमार्गाच्या नकाशानुसार ठिकठिकाणी पाहणीनुसार आवश्यक त्या सूचनाही केडिया यांनी दिल्या.
जामनेर रेल्वे स्टेशनवर म्युझियमची निर्मिती होणार
जामनेर नॅरोगेज रेल्वे स्टेशन तसेच तिकीट घर आदी परिसराची पाहणीदेखील करण्यात आली. दरम्यान, जामनेर रेल्वे स्थानकावर निर्माण होणार्या रेल म्युझियम केंद्राच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना डीआरएम केडिया यांनी दिल्या.
निरीक्षण दौर्या दरम्यान भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ मंडळ अभियंता समन्वय तरुण दंडोतिया, उपमुख्य अभियंता (निर्माण) पंकज धावरे आदी अधिकारी उपस्थित
होते.
वाघूर पुलाची पाहणी
पहूर लोहमार्ग स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या वाघूर नदी पुलाचेदेखील निरीक्षण करण्यात आले. वाघूर नदीपूल ब्रिटिशकालीन असून 1918 दरम्यान पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.