मुंबई : राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर शनिवारपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राहुल नार्वेकर हे रविवारी दुपारी 12च्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील अशी माहिती आहे.
दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकरयांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. राज्यात दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई तसेच आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील, अशी माहिती आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकर याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन. पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदा संदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल. मला पक्षाने अनेक संधी दिली आहे आणि यापुढेही जी संधी दिली जाईल त्यानुसार काम करेन. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार कोणाला अर्ज भरायला सांगितलं जाईल त्याला अर्ज भरावं लागेल.