नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रभारीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून प्रत्यक्ष मतदान २६ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटातर्फे किशोर दराडे यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे देखील निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. दोन उमेदवार देण्यात आल्याने महायुतीत बिघाडी बघावयास मिळत आहे. यापार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने प्रभारी पदाची जबाबदारी सोपली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून ना. महाजनांची नियुक्ती
ना. गिरीश महाजन यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी भाजपा समर्थपणे उभा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदिप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी करावा लागणार सामना करवा लागणार आहे. आता मंत्री गिरीश महाजन नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काय करिष्मा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात राजकीय  डावपेच आखले जात आहेत.  या वादात ना. महाजन यांचा प्रवेश झाला आहे. तसेच महाविकास आघाडीचाही उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय डावपेचात कोण यशस्वी होईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.