Nashik Teachers Constituency : मतमोजणी थांबवली, जाणून घ्या कारण ?

नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे सकाळी 8.00 वाजता सुरू झाली. मतमोजणी साठी एकूण 30 टेबल आहेत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे.

या चुरशीची ठरलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात लढत होत आहे. हि मतमोजणी प्रक्रिया थोड्यावेळाकरीता थांबवण्यात आली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले. प्राथमिक फेरीतएवढ्याच मतपत्रिका असणे अपेक्षित होत्या. मात्र एका मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला आहे.

मंतमोजणी टेबलवर मतदानपत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्त निघाल्या आहेत. टेबलवर मतपत्रिका लावत असतांना हिशोबापेक्षा तीन मतपत्रिका जास्त निघाल्या आहेत. याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. या आक्षेपानंतर चोपडा केंद्रावरील मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबलवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

तीन मतपत्रिका जास्त आल्या कशा ?
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 मत पत्रिका जास्त आढळल्या आहेत.मतमोजणी कक्षातील 22 नंबरच्या टेबलवर मोजण्यात आलेल्या टेबलवर मतपत्रिका जास्त आढळून आल्यात. 3 मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे 3 मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.