‘या’ दिवशी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन ; खटले समारोपचाराने निकाली करुन घेण्याचे आवाहन

जळगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवारी (दि. 27) जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीतून वाद मिटविण्यासाठी तडजोड झाल्यास वादास कायमस्वरुपी पूर्णविराम मिळून पक्षकारांचा पैसा व वेळेची बचत होते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख  यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत होणार्‍या लोकअदालतीसाठी प्रलंबित प्रकरणांपैकी वसूलीची प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र, वीजचोरी, भूसंपादन, अपघात विमा, वैवाहिक, धनादेश अनादर प्रकरणे, मिळकत व पाणी करवसुलीची ग्रामपंचायत व मनपातील प्रकरणे अशी प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत.तसेच ग्रामपंचायत, महापालिका, महावितरण, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँक, दूरध्वनी थकीत रक्कम वसुलीची भारत संचार निगम व इतर खाजगी कंपन्याची प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे अशी  प्रकरणे जळगाव जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत निवाडा करण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालये, कामगार, कौटुंबिक, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक मंच व मोटार वाहन न्यायालय या ठिकाणी पॅनल स्थापन करण्यात आलेली आहेत

ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायची असतील अशा संबंधित सर्व पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने काढण्यासाठी ठेवायचे असतील त्यांना सुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात येणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व जास्तीत जास्त खटले २७ जुलै रोजी समारोपचाराने निकाली करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावतर्फे करण्यात आले आहे.