---Advertisement---
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची अखिल भारतीय स्तरावरील समन्वय बैठक जोधपूर येथे पार पडली. तीन दिवस चाललेल्या या बैठकीत शिक्षण, समाज आणि राष्ट्रीय जीवनातील विविध पैलूंवर तसेच संघ शताब्दीतील योजनांवर चर्चा करण्यात आली.
याविषयी माहिती देताना अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले, या तीन दिवसीय बैठकीत शिक्षण क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला. अखिल भारतीय राष्ट्रीय संस्कृती उत्थान न्यास, भारतीय शैक्षिक महासंघ, विद्या भारती, शिक्षा शिक्षण मंडळ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विविध संघटनांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतील अनुभव कथन केले. शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत मातृभाषेतून अभ्यासाला प्रोत्साहित करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. भारतीय ज्ञान परंपरा आणि शिक्षणाच्या भारतीयीकरणासाठी पुस्तकांचे पुनर्लेखन आणि शिक्षण प्रशिक्षणाचे कार्यही प्रगतिपथावर आहे.
पत्रपरिषदेत देशातील सामाजिक परिस्थितीवरील चर्चेचाही उल्लेख करण्यात आला. पंजाबमध्ये वाढते मतांतरण आणि युवावर्गात फोफावत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी सेवा भारती आणि विद्यार्थी परिषदेद्वारे केल्या जाणान्या समाज जागृती आणि व्यसनमुक्ती अभियानांचीही माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशातून होत असलेल्या घुसखोरीवर आणि नागरी सुरक्षेसंदर्भातील आव्हानांवरही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे, ईशान्येकडील राज्यात कमी झालेला हिंसाचार आणि वाढत्या विकासाच्या संकेतांना सकारात्मक मानले गेले. मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या संवादावर आधारित शांतता प्रयत्नांची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली.
जनजाती क्षेत्रांविषयी आंबेकर म्हणाले की, नक्षली आणि माओवादी हिंसाचारात घट झाली आहे. मात्र, समाजाला भ्रमित करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या छात्रावासांनी आणि जनजातीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. तसेच आदिवासी समाजापर्यंत भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय विचार पोहोचविण्यावरही भर देण्यात आला.
महिलांच्या सहभागावर भर
महिलांच्या सहभागितेवर भर देताना सुनील आंबेकर म्हणाले की, क्रीडा भारतीद्वारे महिला खेळाडूंमध्ये योग-ज्ञान आणि अध्ययनाला प्रोत्साहन दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत महिला कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या ८८७ कार्यक्रमांचा येथे विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. संघटनेत महिलांची भागीदारी सातत्याने वाढत आहे. याचेच हे द्योतक आहे.
मतांतरण, घुसखोरी, काशी-मथुरा या विषयांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे की, या समस्यांचे समाधान संघर्ष किंवा आंदोलनाने नाही तर कायदेशीर मागनि आणि परस्पर संवादाने व्हायला हवे. सर्व भारतीय भाषांचा सन्मान व्हायला हवा, असेही सुनील आंबेकर म्हणाले. पत्रपरिषदेला जोधपूर प्रांत संघचालक हरदयाल वर्मा, अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर, प्रदीप जोशी उपस्थित होते.
संघ शताब्दीचे कार्यक्रम
संघ शताब्दी वर्षातील योजनांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पर्यावरण रक्षण, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्यासारख्या विषयांवर विशेष कार्यक्रम या वर्षभरात चालविले जाणार आहेत. २ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपुरात विजयादशमी उत्सवासह शताब्दी वर्षाचा औपचारिक शुभारंभ होईल.