पुढारी जास्त अन् कार्यकर्ते कमी अशी ओळख असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. जिल्ह्यात मोठ्या प्रयत्नानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत एका मतदारसंघात या पक्षाला यश मिळाले. अमळनेर मतदारसंघातील अनिल पाटील यांच्या रूपाने हे यश मिळाले, मात्र त्यातही पक्षाचा वाटा किती हा प्रश्नच आहे. केवळ जातीय समीकरणे व अनिल पाटील यांचे वैयक्तिक संबंध यामुळे यशाचे पारडे त्यांच्याकडे झुकले. त्यातही आता अनिल पाटील यांनी पक्षातील साहेबांच्या गटाला सोडचिठ्ठी देऊन अजितदादांचे बोट धरले. याचा त्यांना न्याय मिळाला. कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.
पक्षातील फुटीनंतर गेल्या मंगळवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जळगावात दौरा झाला. पवार साहेबांनी जळगावी ‘स्वाभीमान सभा’ घेतली. पक्षात आपापले साम्राज्य स्थापन करून असलेली मंडळी यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली. जिल्ह्यात पक्षातील मरगळीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. पक्षात आलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे वगळता अन्य प्रभावी असे कोण असा प्रश्न पडतो. हेच नेमके हेरून खडसेंवर विधानसभा, लोकसभा निवडणुकांची जबाबदारी सोपविली गेली एवढेच नव्हे तर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली गेली. पक्षातील अनेक साम्राज्यवाद्यांना हा निर्णय म्हणजे धक्काच ठरला. मात्र खडसेंना येथे त्रास आहे असे नाही. त्यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न पक्षातील काही मंडळींकडून केला जात असतो.
‘स्वाभीमान’ सभेतून नेमके काय मिळाले हे एक कोडेच आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विचार करता अनेकांचा स्वाभीमान हा मुंबई, बारामतीतील नेते आले की जागा होतो. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हेच पहाना… सहसा पक्ष कार्यालयात फिरकत नाही… आणि नेते आले की त्यांना उसने अवसान येते. मंगळवारी तर त्यांनी कहरच केला. साहेबांवर छाप पडावी म्हणून त्यांनी आरोप केला की जिल्ह्यातील तीनही मंत्री भ्रष्टाचारी आहेत. भाषण ऐकणाऱ्या साहेबांनीही याकडे लक्ष दिले नाही. (बहुदा त्यांनाही हा विनोद वाटला असावा) किंवा आपण आलो की हा आरडाओरड करतोच…असे त्यांचे मत झाले असावे. आज पारोळा शहराची परिस्थिती काय? अनेक समस्या येथे भेडसावत असतात. मंत्रीपद मिळून काम करू न शकल्याने पारोळेकरांनी डॉ.सतीश पाटील यांना घरचा रस्ता दाखविला. आज या शहरात दहा ते बारा दिवसाआड पाणी येते, त्याकडे अण्णांनी कधी लक्ष दिले नाही.
अखेर आमदार चिमणआबांनी त्यांना धोबीपछाड दिला. हीच स्थिती अन्य मतदारसंघांची आहे. अमळनेरचे डॉ. बी.एस. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याचा या पक्षाने मोठा गवगवा केला. डॉ.बी.एस. पाटील एकेकाळी भाजपतील धडाडीचे नेतृत्व म्हणून परिचित होते. प्रत्येकाचा एक काळ असतो… त्याप्रमाणेच त्यांची परिस्थिती झाली. बी.एस.आबांचे एकेकाळचे शिष्य अनिल भाईदास पाटील यांनी अजितदादांचे बोट धरून बाहेर पडताच त्यांना मंत्रीपद मिळाले. बी.एस.आबा एकदम सावध झाले त्यांनी साहेबांच्या राष्ट्रवादीत उडी मारली. पक्षात यामुळे फार मोठ्या घडामोडी होणार आहेत काय? तर याचे उत्तर नकारार्थीच असेल. अमळनेरात सर्वात हुशार कोण तर माजी आमदार साहेबराव दादाच. भाजपत गेले पण अजित दादांचा फोटो घरात कायम होता…आता तर अजित दादांच्या फोटोसह म्हणजे मोठ्या साहेबांचा फोटोही त्यांच्या घरात आहे.
मग सत्ता कुणाचीही येवो… आहे की नाही गंमत… चोपड्यात अरूणभाई थकले प्रमुख कार्यक्रमांना ते येत असतात. ईश्वरबाबूजी तर सीबीआय, ईडीच्या कारवाईमुळे त्रस्त आहेत. स्टेट बँकेचे कर्जाचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसलंय…बऱ्याच मालमत्ता सील झाल्या आणि ईडीने दुकानातील होते नव्हते तेवढे सोने जप्त केले. उरले कोण तर देवकर आप्पा… घरकुल प्रकरणावरून शिक्षा होणे… मंत्रीपद सोडावे लागणे… त्यानंतर लोकसभा मतदारसंघात आलेले अपयश… ही अपयशाची परंपरा त्यांना सोडायला तयार नाही. सध्या आप्पा जळगाव ग्रामीणमधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करत आहेत. याच मतदारसंघातून उबाठाचे गुलाबराव वाघ कंबर कसून आहेत….भविष्यात आहेच भांडण.. एकंदर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील ही परिस्थिती… प्रत्येक जण नेता… कार्यकर्ता होण्यास कोणीच तयार नाही. पवार साहेब आले म्हणून स्वाभीमानाचे ‘उसने अवसान’ दिसले… पुढे काय? ते भविष्यात दिसेलच…