Natural Tree Wealth of Jalgaon । 4 लाखाहून अधिक ‌‘वृक्ष’संपदेने जळगाव शहर ‌‘समृध्द’

डॉ पंकज पाटील

जळगाव । 40 ते 48 अशं सेल्सीअस वाढत्या तापमानाचा त्रास सहन करणाऱ्या जळगावकरांसाठी एक ‘गुड न्यूज’ समोर आली आहे. जळगाव शहराच्या 19 वॉर्डात सुमारे 4 लाख 17 हजार 597 वृक्ष असल्याची नोंद महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एजन्सीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आली आहे. यातही 1 हजार 44 वृक्षांचे वय हे 50 वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. यावर्षी आणखी २० हजार नवीन वृक्ष लागवड केल्याची माहिती पर्यावरण अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. विशेषतः यामुळे जळगावकरांसाठी नैसर्गिक रित्या गारवा निर्माण होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यासह फेब्रुवारी ते जून या महिन्यात जळगाव शहराचे तापमान हे 40 ते 48 अंश सेल्सीअसपर्यंत पोहचत असते. वाढत्या तापमानावर जास्तीत जास्त वृक्ष लागवड हा पर्याय योग्य असल्याचे सर्वाचेच एकमत असते. परंतु वृक्ष  लागवड व त्यांचे संगोपण करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असते. वाढत्या काँक्रिटीकरणाच्या इमारतींमुळे आणि विविध कारणांमुळे शहरातील वृक्ष संपदा कमी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जून 2024 मध्ये जवळपास 20 हजार नविन वृक्षांची लागवड केली आहे. यावर्षी पर्जन्यमानही चांगले असल्याने यातील 18 ते 19 हजार झाडे जगली असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सांगितले.

असा आहे सावलीचा घेर
50 वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या वड, पिंपळ, आंबा यासारख्या झाडांच्या सावलीचा एकूण घेर हा 3 लाख 31 हजार 908 स्क्वेअर फिट एवढा आहे. तर शहरातील मोजणी झालेल्या एकूण 4 लाख 17,597 वृक्षांच्या सावलीचा एकूण घेर हा 7.25 स्क्वेअर किमी. एवढा आहे.

या संस्थेने केले सर्वेक्षण
गेल्या सहा महिन्यापुर्वी नवी मुंबई येथील ऑरनॉट टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीच्या 60 कर्मचाऱ्यांनी हे सर्व्हेक्ष्ाण केले. या कर्मचाऱ्यांनी शहराच्या 19 वॉर्डातील प्रत्येक घराच्या जवळ जात तेथे या वृक्षांची नोंद करून त्याचे छायाचित्रही घेतले आहे. हे छायाचित्र त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरही अहवालासोबत जोडलेले आहे.

वॉर्ड 19 मध्ये तब्बल दीड लाख वृक्षसंपदा
शहराच्या वॉर्ड क्रमांक 19 मध्ये तब्बल 1 लाख 68 हजार 221 वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. सर्व वॉर्डात असलेल्या वृक्षांमध्ये या वॉर्डात ही सर्वाधिक वृक्षसंख्या आहे. तर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 456 एवढ्या वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 15 मध्ये 869 वृक्षसंख्या आढळली आहे.

अशी आहे वॉर्ड निहाय वृक्षसंख्या
वॉर्ड क्र. 1 – 9,708
वॉर्ड क्र. 2 – 13,222
वॉर्ड क्र. 3 – 26,540
वॉर्ड क्र. 4 – 456
वॉर्ड क्र. 5 – 6,139
वॉर्ड क्र. 6 – 15,613
वॉर्ड क्र. 7 – 10,597
वॉर्ड क्र. 8 – 25,384
वॉर्ड क्र. 9 – 7,665
वॉर्ड क्र. 10 – 17,634
वॉर्ड क्र. 11 – 11,909
वॉर्ड क्र. 12 – 18,048
वॉर्ड क्र. 13 – 18,235
वॉर्ड क्र. 14 – 11,779
वॉर्ड क्र. 15 – 869
वॉर्ड क्र. 16 – 4,250
वॉर्ड क्र. 17 – 45,825
वॉर्ड क्र. 18 – 5,503
वॉर्ड क्र. 19 – 1,68,221

असे आहेत सर्वाधिक वृक्ष असलेले वॉर्ड
वॉर्ड क्रमांक 19, 17,13, 3 व 8 या वॉर्डात सर्वाधिक वृक्षसंख्या आहेत.

पुढील वर्षी 62 हजाराचे लक्ष्य
शहराच्या विविध भागासह वॉर्डातील वृक्ष संख्येत वाढ करण्यासाठी महापालिकेसह स्वयंसेवी सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी नागरिक, विविध उद्योजक कंपन्या यांच्या मदतीने पुढील वर्षात 62 हजार 403 नविन वृक्ष्ा लागवडीचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

अशी आहे शहरातील वृक्षसंपदा
शहरातील एकूण वॉर्ड संख्या : 19
देशी वृक्ष : 3 लाख 3,980
विदेशी वृक्ष : 1 लाख 13,617
जात : 176 प्रकारच्या जातीचे वृक्ष
50 वर्षापेक्षा जास्तीचे वय असलेले वृक्ष  : 1 हजार 44
एकूण वृक्ष संपदा : 4 लाख 17, 597

 

यावर्षी 20 हजार नवीन  वृक्ष्ा लागवड
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने जवळपास 20 हजार नविन वृक्ष्ाांची लागवड केली आहे. त्यामुळे या वृक्ष्ा मोजणीत यांचा समावेश करण्यात आलेला नाही. याचा समावेश केला तर आजमितीस शहरात 4 लाख 37 हजार 597 वृक्ष्ासंख्या आहे.
– प्रकाश पाटील, अभिंयंता पर्यावरण विभाग,
 महापालिका जळगाव