नवव्या वर्षीच सुरभी झाली लखपती

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव ः सोनी एन्टरटेनमेंट वाहिनीवर सुरु असलेल्या ’कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात जळगाव येथील आजोळ असलेली सुरभी त्रिपाठी ही चिमुकली अवघ्या नवव्या वर्षीच लखपती झाली आहे.

सध्या सोनी वाहिनीवर ’कौन बनेगा करोडपती’ हा महानायक अमिताभ बच्चन संचालन करीत असलेला कार्यक्रम सुरु असून ज्युनिअर गटातील स्पर्धकांमधून सुरभी ही चौथ्या इयत्तेत शिकत असलेली ९ वर्षांची चिमुकली विद्यार्थिनी सहभागी झाली होती. १२ व १३ डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या २ भागांपैकी पहिल्या भागात ४ प्रश्नांची उत्तरे देऊन १० हजार पॉइंट जिंकले. मात्र वेळ संपल्यामुळे १३ रोजीच्या दुसर्‍या भागात हॉट सीटवर बसून ’बिग बी’ नी विचारलेल्या उर्वरित विविध प्रश्नांना आपल्या बालबुध्दीचातुर्‍याने उत्तरं देत व अवघड प्रश्नांना शिताफीने लाइफलाइनच्या आधारे एकूण ११ प्रश्नांची अचुक उत्तरे देऊन ६ लाख ४० हजार पॉइंट्स जिंकले. १२ व्या १२ लाख ५० हजार पॉइंट्सच्या प्रश्नाचे उत्तर येत असूनही खात्री नसल्याने रिस्क न घेता तिने खेळ थांबवला. १८ व्या वर्षी तिला पॉइंट्सच्या रुपातील ही रक्कम पैशांच्या रुपात मिळेल. सुरभी ही आपल्या आई-वडिलांसमवेत अहमदाबाद येथे वास्तव्यास असून तिचे आजोळ जळगावातील श्रध्दा कॉलनीतील आहे. रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले स्टेशन अधीक्षक व साबण शिल्पकार अरुण पाटील यांची ती नात (मुलीची मुलगी)आहे. संपूर्ण भारतातून नोंदणी केलेल्या हजारो स्पर्धकांमधून विविध किचकट चाचण्यांच्या आधारे वैयक्तिक मुलाखतीतून ८ ते १५ वयोगटातील स्पर्धकांमध्ये सुरभीची निवड झालेली आहे.एवढ्या खडतर निवड चाचणीतून ’केबीसी’च्या १४ व्या सीझनच्या ’हॉट सीट’पर्यंत पोहोचलेली सुरभी ही काही मोजक्याच चिमुकल्यांपैकी एक ठरलेली असून खानदेशाचे नाव तसेच तिच्या शाळेचे नावही केबीसी च्या मंचावर घेऊन जाणारी ती पहिलीच स्पर्धक आहे.