नवी मुंबई : बांगलादेशातील गंभीर परिस्थिती असताना नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी 5 बांगलादेशींना अटक केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील एका इमारतीतून या लोकांना अटक करण्यात आली आहे.
बांगलादेश-भारत सीमेवरून आरोपींनी घुसखोरी करून तेथून नवी मुंबई गाठली होती. आरोपी नवी मुंबईत आल्यानंतर कोपरखैरणे परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते. या आरोपींमध्ये 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंसाचार आणि निदर्शने सुरूच आहेत. अंतरिम सरकारचे नेते मोहम्मद युनूस यांनी हिंदू आणि अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. असे असतानाही देशात हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, गोपालगंज भागात आंदोलकांनी लष्करावर हल्ला केला ज्यात लष्कराचे पाचहून अधिक जवान जखमी झाले. शनिवारी लष्कराचे जवान आणि अवामी लीग समर्थकांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीनंतर जमावाने लष्कराचे वाहन जाळले.
या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह सुमारे 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना गोळ्या लागल्या आहेत. सदर उपजिल्हातील गोपीनाथपूर बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशात परत यावे या मागणीसाठी हजारो अवामी लीगचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिकांनी महामार्ग रोखून निषेध करण्यासाठी एकत्र आले होते. लष्कराच्या जवानांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना रस्ता रिकामा करण्याचे निर्देश दिले. मात्र जमावाने त्यांच्यावर विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड करून ती पेटवून दिली.