राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील

जळगाव : राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी चाळीसगावचे प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली. पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या संकल्पनेतून पक्षश्रेष्ठींनी ही नियुक्ती केल्याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकद वाढीला मदत मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा विश्वास माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला. पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. याप्रसंगी

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पक्षाची जबाबदारी दिल्याबद्दल जिल्ह्यातील नेत्यांचे आभार मानले. जिल्ह्याचा दौरा करून दहा ते बारा दिवसात कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात दबंगगिरी होत आहे. या विरोधात आपला लढा असणार आहे. नारपारचे पाणी गिरणा खोऱ्याला जोडता येणार नाही, या भूमिकेमुळे लोकांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या विरोधात गावसंवाद यात्रा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर आरंभ केली जाईल, असेही प्रमोद पाटील म्हणाले.

आगामी निवडणुकीत पक्षाकडून जिल्ह्यात सहा ते सात जागा लढविण्याची आमची तयारी आहे. चाळीसगाव, जामनेर, चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर, मुक्ताईनगर, भुसावळ या मतदार संघात निवडणूक लढविण्याची पक्षाने तयारी केली आहे. जिल्ह्यात पक्षाला सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. जिल्हाध्यक्ष नियुक्ती झाल्याने आता पक्षाला तरुण चेहरा लाभला आहे, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आल्याचे देवकर यांनी सांगितले.