अमळनेर (जळगाव) : जळोद रोडवर जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त –
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्हेंबरच्या रात्री गस्त घालत (Jalgaon) असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली.जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून गांजाची अवैध वाहतूक होत आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजय नाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा रचून ५३ किलो गांजा यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे १२ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याची घटना आज (ता. १८) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर घडली.
बचावासाठी आरोपी पळू लागले उलट्या दिशेने
१८ नोव्हेंबरच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसली. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी देखील लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला. बचावासाठी आरोपीनी आपली वाहने नन्दगाव रस्त्याला वळवली. आरोपीना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला.
पोलीस वाहनाच्या प्रकाशात कारमधून उतरणारा आरोपी सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा. गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. त्याच्यासोबत आणखी तीन अनोळखी आरोपी देखील पळून गेले. पोलिसांनी कारची डीक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाची २५ गांजाची पाकिटे आढळून आली. तसेच आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल, दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.