NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींची आत्महत्या

जयपूर:  भारतातील कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना थांबत नाहीत. आता एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी, उत्तर प्रदेशातील औरैया येथील रहिवासी निशा यादव (21) हि कोटा येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये NEET ची तयारी करत होती. शिकण्यासोबतच ती महावीर नगर परिसरातील वसतिगृहातही राहात होती. निशा सहा महिन्यांपूर्वीच तिच्या घरून  कोटा येथे आली होती. आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थिनीचे वडिलांशी मोबाईलवर बोलणे झाले होते.रात्री 11 वाजता वडिलांनी पुन्हा फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही.त्यानंतर वडिलांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास श्याम पेशवानी (वसतिगृह चालक) यांना फोन केला.

वसतिगृह चालकाने खोलीचा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून रात्री दीडच्या सुमारास खोलीचा दरवाजा तोडला असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा तपास करत असलेले जवाहर नगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कुंदन कुमार यांनी सांगितले की, निशाचा मृतदेह ओढणीने  फास लावून पंख्याला लटकलेला होता. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.